बेळगावत बकरी चारवण्यासाठी आलेल्या असताना यूपीसीचा निकाल जाहीर : बिरदेव डोणे उत्तीर्ण

बेलगाम प्राईड/ बेळगाव सीमाभागातील विविध ग्रामीण भागात भटकंती करत मेंढराना चारवत प्रतिकूल परिस्थितून देशातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या बिरदेव डोणे याचा युवा समिती सीमाभाग बेळगावच्यावतीने सत्कार करून गौरवण्यात आले.
कोल्हापूर जिल्हातील कागल तालुक्याच्या यमगे गावचा युवक बिरदेव सिद्दाप्पा डोणे हा भारतीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2025 च्या परीक्षेत देशात 551 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या डोणे कुटुंबातील बिरदेव बेळगाव सीमाभागातील विविध गावात भटकंती करत मेंढराना चारवत प्रतिकूल परिस्थितून भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. हे विशेष होय.
युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्याच्या सत्काराप्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बिरदेव ढोणे या युवकाने आपली मातृभाषा मराठीतून शिक्षण घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घातली आहे. मंडोळी रोड येथे भटकंती करत आपल्या परिवारासह झोपडीत राहून यश गाठणे हे कौतुकास्पद असून याची प्रेरणा इतरांनी घ्यावी, असे प्रतिपादन केले. त्यानंतर अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन बिरदेवचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभम शेळके यांनी बिरदेव याने जे यश गाठलेले आहे ते जिद्द व चिकाटीच्या जोरावर संपादन केले असून प्रत्येकाने आपली जी मातृभाषा असेल त्यातूनच शिक्षण घेतले पाहिजे. बिरदेव याच्या यशाचा खडतर प्रवास अतिशय कौतुकास्पद आहे. असे सांगून संत तुकारामाच्या पंक्तीप्रमाणे “असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे,” या शब्दात बिरदेवचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना बिरदेव डोणे याने संघटनेचे आभार मानले. तसेच प्रत्येकाने आपल्या मातृभाषेत शिक्षण घेताना कुठलाही संकुचीतपणा न बाळगता यशाची गुरुकिल्ली जाणली पाहिजे. आर्थिक परिस्थितीची काळजी न करता जिद्दीने शिक्षण घेतल पाहिजे व प्रत्येकाने निर्व्यसनी राहून समाजाला एक चांगली दिशा दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, विजय जाधव, भागोजी पाटील,अशोक घगवे, राजू पाटील, रणजीत हावळाणाचे, रमेश माळवी, सचीन दळवी, दिपक गौडवाडकर, शुभम जाधव, अभिषेक कारेकर, अशोक डोळेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.