
बेलगाम प्राईड / बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी पोलिसांनी बाल तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले असून याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली तर दोघे जण फरारी आहेत. या टोळीने विधवांना महिलांना लक्ष्य करत त्यांच्या असुरक्षितेचा गैरफायदा घेऊन दुसरे लग्न लावून देणे नंतर त्यांची मुले विकण्याचा प्रकार केला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी आज पत्रकारांना दिली.
याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे संगीता गोवळी, संगीता तावडे आणि मोहन तावडे अशी असून हे सर्व जण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. अन्य आरोपी नंदकुमार दोराळेकर व नंदिनी दोराळेकर हे फरारी असून यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ताज्या प्रकरणात हुक्केरी तालुक्यातील सुलतानपूर गावात राहणाऱ्या अर्चना हिचा समावेश असल्याचे तपासा उघडकीस आले आहे.
राजू मगदूमसोबत दुसरं लग्न करणाऱ्या अर्चनाला पहिल्या लग्नापासून एक मुलगा झाला. ते आजारी बाळ टोळीचे लक्ष्य बनले. वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करू, असे सांगून तावडे दाम्पत्याने अर्चनाला मुलाना महाराष्ट्रातील गडहिंग्लज येथे पाठवण्यास सांगितले. मात्र, बाळाला मदत करण्याऐवजी या दाम्पत्याने गडहिंग्लज येथील संगीता गोवळी हिच्या राहत्या घरी त्या बाळाला दोराळेकर कुटुंबाला 3 लाख रुपयांना विकले. त्यानंतर आरोपींनी विक्रीतून मिळालेली रक्कम वाटून घेतली.
बेळगाव जिल्हयात अशा प्रकारच्या अत्यंत निंद्य गुन्ह्यांची ही पहिलीच घटना नाही. आठवड्याभरापूर्वी संगीता नावाची आणखी एक विधवाही याच टोळीची शिकार झाली होती. तिचे दुसरे लग्न ठरल्यानंतर आधीच्या लग्नातील तिचे पहिले जन्मलेले अपत्य 4 लाख रुपयांना विकले गेले.
हुक्केरी पोलिसांनी यापूर्वी सदर घटनेशी संबंधित चार जणांना अटक केली आहे. आपल्या कर्तव्यदक्ष तत्पर पथकाच्या नेतृत्वाखाली हुक्केरी पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत आणि उर्वरित संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे. हुक्केरी पोलिसांनी बालकांच्या तस्करीचे जाळे उध्वस्त केले असले तरी या भागातील मुलांच्या तस्करीच्या चिंताजनक प्रवृत्तीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे.