बेळगाव ते बंगळुरू वंदे भारत ट्रेनला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील
खासदार जगदीश शेट्टर यांच्या प्रयत्नांना यश

बेलगाम प्राईड / बेळगाव ते बंगळुरू दरम्यान वंदे भारत ट्रेनला अखेर केंद्र सरकारने मंजूरी दिली असून जिल्ह्यातील जनतेची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. या संदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता, त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले आहे.
दरम्यान या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव ते बंगळुरू दरम्यान वंदे भारत ट्रेनला केंद्र सरकारने मान्यता दिली ही आनंदाची बाब असल्याचे मत व्यक्त केले. सातत्यपूर्ण प्रयत्नातून बेळगावच्या जनतेचे स्वप्न साकार केल्याचे समाधान वाटले. बेळगाव ते बेंगळुरू दरम्यान वंदे भारत ट्रेन सेवेमुळे प्रवास अधिक सुकर होईल. बेळगावच्या सर्वांगीण विकासाला ते पूरक ठरेल. वेळ निश्चित करून लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही.सोमन्ना यांचे त्यांनी आभार मानले.