चोरी प्रकरणी दोघे गजाआड; 6.48 लाखांचे दागिने जप्त

बेलगाम प्राईड :महाद्वार रोड येथील घरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी मार्केट पोलिसांनी दोघा चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्या जवळून 6.48 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयीतांची नावे चंद्रकांत उर्फ प्रेम संतोष कोटगी (वय 19) रा श्री अश्वत्थामा मंदिराजवळ पांगुळ गल्ली) आणि ओमकार भावकाण्णा पाटील (वय 20, रा. लाल बहादूर शास्त्रीनगर, कलखांब) अशी आहेत. सोबत कांही अल्पवयीन मुलांना घेऊन या जोडगोळीने चोऱ्या, घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. महाद्वार रोड येथील रूपाली विनायक बिर्जे यांच्या घरी गेल्या 3 फेब्रुवारी 2024 रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रूपाली यांच्या घरी चोरण्यात आलेल्या दागिन्यांच्या विक्रीसाठी वरील दोघे जुन्या भाजी मार्केट जवळ आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. पोलीस चौकशीत चंद्रकांत आणि ओमकार यांनी महाद्वार रोड, कलखांब, बसवन कुडची येथे चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्या जवळील 6 लाख 48 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
मार्केट पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक एच. एल. केरूर, आय. एस. पाटील, लक्ष्मण कडोलकर, शिवाप्पा तेली, शंकर कुगटोळी, सुरेश कांबळे, कार्तिक आदींनी उपरोक्त कारवाई केली. पोलीस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांनी चोरीचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.