
बेलगाम प्राईड : स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांचा वैशिष्ट्यपूर्ण भव्य प्रकल्प असणाऱ्या दिव्यांग आणि वंचित मुलांसाठीच्या 23 व्या मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला. शिबिराचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
जेएनएमसी कॅम्पस, बेळगाव येथील केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव येथे आयोजित सदर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध जलसंरक्षक डॉ. शिवाजी कागणीकर आणि इंजिनीअर्स कॉम्प्युटर अकादमीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रमेश गंगूर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्विमर्स क्लब बेळगावच्या अध्यक्ष लता कित्तूर, शिबिराचे मुख्य संयोजक उमेश कलघटगी, केएसए सदस्य व स्विमर्स क्लबचे सचिव सुधीर कुसणे यांच्यासह पालक व जलतरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर जलतरण प्रशिक्षण शिबिर केएलई सोसायटी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दिव्यांग आणि वंचित मुलांच्या सहकार्याने सलग 21 दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या या शिबिरात शारीरिकदृष्ट्या अपंग, दृष्टिहीन, बौद्धिकदृष्ट्या विकलांग, मूकबधिर, तसेच वंचित अशा 200 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला आहे. या शिबिराच्या माध्यमातून प्रतिभावान उदयोन्मुख जलतरणपटूंची वर्षभरातील स्पर्धात्मक प्रशिक्षणासाठी निवड केली जाते आणि स्पर्धेची तयारी करण्यासाठी त्यांना पद्धतशीर आणि वैज्ञानिक प्रशिक्षण दिले जाते. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी 20 हून अधिक जलतरण प्रशिक्षक आणि स्वयंसेवक विशेष परिश्रम घेतात
स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या या शिबिराच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षात 5000 हून अधिक अपंग आणि वंचित मुलांना या खूप फायदा झाला आहे. विशेष म्हणजे शिबिरात सहभागी मुलांना मोफत वाहतूक, एक पोहण्याचे किट आणि प्रत्येक दिवशी मुख्य आहार (स्टेपल डायट) यासह पोहण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. आपल्या या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून स्विमर्स व एक्वेरियस क्लबने आजपर्यंत असंख्य कुशल जलतरणपटू घडविण्याबरोबरच 9 उत्कृष्ट जलतरणपटू तयार केले आहेत. ज्यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आणि एकूण 60 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.