गणेशपूर डोंबारी कॉलनीला राज्य महिला आयोग अध्यक्षांची भेट

बेलगाम प्राईड : शहराशेजारी गणेश पूर रोडवरील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील डोंबारी कॉलनीला आज मंगळवारी सकाळी कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डाॅ. नागलक्ष्मी चौधरी यांनी भेट देऊन तेथील असुविधांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
डोंबारी कॉलनीतील मूलभूत सुविधांच्या अभावांबद्दल संताप व्यक्त करून कॉलनीतील रहिवाशांना तात्काळ आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली. या ठिकाणी दररोज व्यवस्थित पाणी पुरवठा केला जावा. येथील मुलांना शिक्षणासाठी कन्नड शाळेमध्ये दाखल करण्याच्या दृष्टीने क्रम हाती घेतले जावेत. तसेच पियूसी अर्थात पदवीपूर्व अभ्यासक्रमानंतर पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि पीयूसी अभ्यासक्रम अर्धवट सोडलेल्या मुला -मुलींची यादी तयार करावी अशी सूचनाही डाॅ.नागलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना केली.
आवश्यक नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आरोग्य खात्याने डोंबारी कॉलनीतील रहिवाशांची नियमित आरोग्य तपासणी करावी. सामाजिक सुरक्षता योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना शोधून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पडले तरच जनतेला सरकारी सुविधांचा लाभ मिळणे शक्य आहे. हे लक्षात ठेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले काम चोख बजावले पाहिजे असे निर्देश डाॅ. नागलक्ष्मी चौधरी यांनी दिले. याप्रसंगी समाज कल्याण खात्याचे संचालक रामनगौडा कन्नोळ्ळी, महिला व बाल कल्याण खात्याचे उपसंचालक नागराजु यांच्यासह आरोग्य, ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.