गोकाक महालक्ष्मी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी १४ आरोपींची मालमत्ता जप्त :अधिक्षक भीमाशंकर गुळेद

बेलगाम प्राईड /गोकाक येथील महालक्ष्मी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी १४ आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
सोमवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, गोकाक महालक्ष्मी अर्बन को ऑप क्रेडिट बँकेतील ७४.८६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारा बाबत गोकाक शहर पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण १४ जणांचा समावेश असून, ५ आरोपी या बँकेचे कर्मचारी आहेत.सागर हा बँकेच्या फसवणुक प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या मालमत्तेची एकूण किंमत ६.९७ कोटी रुपये असून त्याने ८१ कोटी रुपये दुसऱ्याच्या नावावर जमा केले आहेत. तसेच त्याच्या नावावर बँकेचे कर्ज आहे.
बँकेच्या व्यवहारांचे चार वेळा ऑडिट केले जाते. मात्र, हा एक मुद्दा सापडला नाही. या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांसह आमच्या पोलिसांनी ११२ मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्याची सरकारी किंमत १३.१७ कोटी असून त्याचे बाजारमूल्य ५० कोटी रुपये आहे. दरम्यान ११ आरोपींनी २०२१ ते २०२४ या कालावधीत या बँकेत ६ कोटी फिक्स डिपॉंझिट जमा केले असून ८१ कोटींचे कर्ज त्यांच्या नावे केले आहे.
गोकाक महालक्ष्मी अर्बन को. ऑप क्रेडिट बँकेतील गैरव्यवहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही ७ टीम देखील तयार केल्या आहेत. सध्या बँकेत फसवणूक करणाऱ्या ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बँकेतील पैसे बुडालेल्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याची काळजी बँकेचे व्यवस्थापन मंडळ घेईल, असे ते म्हणाले.