Uncategorized
Trending

हजारो भक्तांच्या उपस्थितीत सुळेभावी श्री महालक्ष्मी यात्रा 

बेलगाम प्राईड /सुळेभावी (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी यात्रेला हजारो भक्तांच्या उपस्थितीत काल मंगळवारपासून अपूर्व उत्साहात भक्तीभावाने यात्रेला प्रारंभ झाला. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त देवीच्या मंदिरासह संपूर्ण गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण सुळेभावी गाव विद्युत रुष्णांनी झगमगून गेले आहे. काल मंगळवारी रात्री उशिरा गावातील श्री विश्वकर्मा बडीगेर यांच्या निवासस्थानाहून देवीची ओटी भरून देवीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. हजारो भाविकांचा सहभाग असणाऱ्या या मिरवणुकीच्या माध्यमातून देवीला गावात फिरवण्यात आले.

विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे भंडाऱ्याची उधळण न करता स्वच्छ खुल्या वातावरणात ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रदूषण रोखून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी यंदा गावकऱ्यांनी मिरवणुकीमध्ये भंडाऱ्याच्या उधळणीला फाटा देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. सदर मिरवणुकीने गावात फिरून श्री महालक्ष्मी देवी अखेर सीमेवर विराजमान झाली. सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी देवी ही नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे तिचे लाखो भक्त आहेत. देवीच्या यात्रेच्या निमित्ताने सध्या बेळगाव जिल्हासह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो भाविक सुळेभावी येथे दर्शनासाठी दाखल होत आहेत.

श्री महालक्ष्मी देवी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी, ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाकडून परिश्रम घेतले जात असून येणाऱ्या भाविकांनाही सहकार्याचे आवाहन केले जात आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button