Uncategorized
Trending

जिल्हा पंचायत सभागृहात महिला दिन उत्साहात 

बेलगाम प्राईड : जिल्हा पंचायत सभागृहात आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी महिला सशक्तीकरणासाठी स्व-उद्योग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा सल्ला दिला. महिलांनी बँकांच्या विविध योजनांचा लाभ घेत स्व-उद्योग सुरू करावा, तसेच ‘एनआरएलएम’ योजनेच्या मदतीने आर्थिक स्वावलंबन साधावे, असे त्यांनी सांगितले. महिलांनी केवळ कामगार बनण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून मालकी हक्क मिळवावा, असे ते म्हणाले.

महिला सशक्तीकरणासाठी शासनाने विविध योजना राबवल्या असून, कर्नाटक सरकारच्या कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका विभागाच्या माध्यमातून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मागील अर्थसंकल्पात राज्यभरात ५०० ‘अक्का कॅफे’ सुरू करण्याची घोषणा केली होती. यातील पहिला ‘अक्का कॅफे’ बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आला असून, दुसरा कॅफे बेळगाव जिल्हा पंचायत आवारात सुरू झाला आहे. या कॅफेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे राहुल शिंदे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पंचायतचे प्रकल्प संचालक रवी बंगारेप्पण्णावर यांनी महिलांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती साधल्याचे नमूद केले. महिलांनी आपल्या कार्यक्षमतेने पुरुषांपेक्षा आपण कमी नाही, हे सिद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, जिल्हा पंचायतच्या लेखाधिकारी डॉ. गंगा हिरेमठ यांनी बेळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत स्तरावर महिला घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असल्याचे सांगितले. अनेक महिला स्वतः कचरा व्यवस्थापन वाहनांचे संचालन करत असून, हे महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण),’ ‘नरेगा,’ ‘राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान’ आणि ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २० महिलांचा सन्मान करण्यात आला. बस्तवाड गावातील घनकचरा व्यवस्थापन वाहन चालवणाऱ्या कावेरी बसवराज पाटील यांनी सन्मान स्वीकृत करताना सांगितले की, या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळत असून, त्यामुळे त्या आत्मनिर्भर होत आहेत.

कार्यक्रमास जिल्हा पंचायतचे मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवतार, सहायक संचालक जयश्री नंदेण्णवर, कार्यालयीन व्यवस्थापक बसवराज मुरघमठ, अधीक्षक सुशीला वण्णूर, शिल्पा चौगुले यांसह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button