Uncategorized
Trending

केंद्राकडून सौंदत्ती यल्लम्मा डोंगर विकासासाठी 100 कोटी मंजूर

बेलगाम प्राईड /केंद्र सरकारने जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी प्रतिष्ठित पर्यटन स्थळे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करताना देशातील 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य (एसएएससीआय) योजनेंतर्गत मान्यता दिली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल गुरुवारी ही घोषणा केली.

सदर उपक्रमामध्ये पर्यटन स्थळे आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी राज्यांना मदत करण्यासाठी एकूण 3,295 कोटी रुपयांच्या व्याजमुक्त कर्जाचा समावेश आहे. निवडक प्रकल्पांमध्ये कर्नाटकातील सौंदत्ती डोंगरावरील यल्लम्मा मंदिरासाठी सर्वाधिक निधी 100 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

एसएएससीआय योजना राज्यांना प्रतिष्ठित पर्यटन केंद्रांच्या सर्वसमावेशक विकासासाठी 50 वर्षांचे व्याजमुक्त कर्ज प्रदान करते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला हिरवा कंदील दाखवला होता. आणि प्रकल्पांना चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने क्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. कमी ज्ञात पर्यटन स्थळांच्या विकासाला प्रोत्साहन देताना या स्थळांच्या आंतरराष्ट्रीय संकल्पना आणि विपणनावर या योजनेद्वारे भर देण्यात येणार आहे.

निवडलेल्या प्रकल्पांमध्ये बेळगाव (कर्नाटक) येथील सौंदत्ती यल्लम्मा मंदिर व डोंगर, ताटागुनी (बेंगळुरू) येथील रोरीच आणि देविका राणी इस्टेट, बटेश्वर (उत्तर प्रदेश), फोंडा (गोवा), गांडीकोटा (आंध्र प्रदेश) आणि पोरबंदर (गुजरात) यांचा समावेश आहे. प्रादेशिक सल्लामसलत आणि राज्य सरकारांनी तपशीलवार प्रस्ताव सादर केल्यानंतर या स्थळांची निवड करण्यात आली आहे. सौंदत्ती यल्लम्मा डोंगर हे कर्नाटकातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून एसएएससीआय योजनेअंतर्गत या तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास केला जाईल.

या प्रकल्पात भाविकांच्या सोयीसाठीच्या आधुनिक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी 100 कोटी रुपयांच्या अनुदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा प्रकल्प मंदिराच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत लक्षणीय प्रगती करेल आणि एक प्रमुख सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल, असे खासदार शेट्टर म्हणाले. दरम्यान हे अनुदान जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी असलेल्या योजनेच्या घटकाचा एक भाग आहे.

एसएएससीआय अंतर्गत निवडलेल्या कर्नाटकातील दोन स्थळांपैकी सौंदत्ती यल्लमा मंदिर व डोंगर एक असल्याने या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार असून रोजगार निर्माण होण्याबरोबरच प्रदेशाच्या सांस्कृतिक जतनामध्ये योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button