कर्तव्यात कसूर पणा केल्याच्या कारणा वरून दोन पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

बेलगाम प्राईड / बेळगाव शहरातील सीपीएडी मैदानावर काल आयोजित काँग्रेस पक्षाच्या सभेत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसखोरी करून मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांना काळे झेंडे दाखवून गोंधळ घातल्या या प्रकरणी दोघा पोलिस कॉन्स्टेबलना निलंबित करण्याचा आदेश बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) चेतनसिंग राठोड यांनी बजावला आहे. खडेबाजार पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल बी. ए. नौकुडी आणि कॅम्प पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल मल्लप्पा हडगिनाळ अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
काँग्रेस पक्षाच्या सभेप्रसंगी व्यासपीठ परिसरातील सुरक्षेची जबाबदारी एएसपी, एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर असताना अशा वरिष्ठ कोणत्याही अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याऐवजी आयजीपींनी कॉन्स्टेबल दर्जाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा हा प्रकार केला आहे. विशेष म्हणजे निलंबित झालेले दोघे कर्मचारी व्यासपीठा जवळील सुरक्षा व्यवस्थेत तैनातच नव्हते. बी. ए. नौकुडी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे तर मल्लप्पा हडगिनाळ अन्यत्र सेवा बजावत होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
मात्र असे असूनही कार्यक्रमाच्या व्यासपीठा ठिकाणी असलेल्या कोणत्याही पोलिसांच्या वर अशी कारवाई न करता इतर ठिकाणी असलेल्या पोलिसांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. हे दोन्ही पोलीस गुप्त विभागात काम करीत असतात अशा गुप्त माहिती गोळा करून निदर्शनांची कारवाई रोखण्यात अपयश आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे, असे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.