Uncategorized
Trending

महापौर पदी निवड मंगेश पवार तर उपमहापौर वाणी जोशी

बेलगाम प्राईड /बेळगाव महापालिकेच्या 23 व्या कार्यकाळातील नूतन महापौरपदी प्रभाग 41 वडगाव चे नगरसेवक मंगेश पवार यांची, तर उपमहापौरपदी प्रभाग 44 अनगोळच्या नगरसेविका वाणी जोशी यांची निवड झाली आहे. या नवनिर्वाचित झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विजय संपादन केला.

साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज अखेर सुरळीत पार पडली. सदर निवडणूक प्रक्रियेला आज सकाळी नाडगीताने प्रारंभ झाला. त्यानंतर सभागृहातील उपस्थित सदस्यांच्या हजेरी वेळी 65 पैकी 60 सदस्य उपस्थित होते. याची नोंद घेऊन गणपुर्ती पडताळणी पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंतच्या कालावधी इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळेचे महापौर पद सामान्य प्रवर्गासाठी आणि उपमहापौर पद सामान्य महिला असे आरक्षित होते. त्यामुळे महापौर पदासाठी सत्ताधारी गटातून नगरसेवक मंगेश पवार, राजू भातकांडे, नितीन जाधव विरोधी पक्षातून बसवराज मोदगेकर तर उपमहापौर पदासाठी सत्ताधारी गटातून वाणी जोशी, दिपाली टोपगी, वीणा विजापुरे, रेखा हुगार व सविता पाटील विरोधी गटातून लक्ष्मी लोकरे इच्छुक होत्या.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची पडताळणी करून त्यांची घोषणा करण्यात आली. तसेच अर्ज मागे घेण्याचा कालावधी समाप्त होताच इतरांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक रिंगणातील महापौर पदाच्या निवडणुकीसाठी मंगेश पवार व मोदगेकर यांच्या नावाची, त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी वाणी जोशी व लक्ष्मी लोकरे उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. निवडणूक अधिकारी प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टणावर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. यावेळी दोन्ही पदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात आले.

त्यामध्ये महापौर पदाच्या मतदानामध्ये मंगेश पवार यांना 40 मते आणि प्रतिस्पर्धी मोदगेकर यांना 20 मते पडली. त्याचप्रमाणे उपमहापौर पदाच्या मतदानात वाणी जोशी यांना 40 मते, तर लक्ष्मी लोकरे यांना 20 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकारी संजीव शेट्टणावर यांनी महापौरपदी मंगेश पवार आणि उपमहापौरपदी वाणी जोशी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. बेळगाव महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे दक्षिण मतदार संघालाच मिळाली आहेत यंदा उत्तर मतदार संघाला एकही पद मिळाले नाही याची चर्चा मनपा सभागृहात यावेळी ऐकावयास मिळाली.

निवडणुकीनंतर निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेले प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टणावर माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर तसेच दक्षिणचे आमदार अभय पाटील माजी आमदार अनिल बेनके मनपा आयुक्त शोभा बी यांनी महापौर व उपमहापौर पदी निवड झाल्याबद्दल अनुक्रमे मंगेश पवार आणि वाणी जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button