Uncategorized
Trending

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन सोहळा 

बेलगाम प्राईड : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आदर्श मराठी शाळा पुरस्कारांचे वितरण, सामान्यज्ञान स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान आणि दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सालाबादप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आकाश चौगुले व इतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आकाश चौगुले (IRS), अप्पर आयुक्त, जीएसटी, बेळगाव यांनी उपस्थित राहून “मातृभाषेतून शिक्षण, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर आणि संधी” या विषयावर तसेच मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि त्यांचा करिअर विकास यावर मार्गदर्शन केले.

मराठी भाषेतून शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही “युवा समिती आदर्श मराठी शाळा पुरस्कार” जाहीर करण्यात आले. कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी इंग्रजी शिक्षणाच्या ओढीमध्येही मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शाळांची निवड करण्यात आली.

यावर्षी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हलशी (ता. खानापूर), सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कणकुंबी (ता. खानापूर), सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडी (ता. बेळगाव), सरकारी मराठी प्राथमिक शाळा बेनकनहळी (ता. बेळगाव) आणि व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळा, भाग्यनगर या शाळांना आदर्श मराठी शाळा या शाळांना पुरस्काराने गौरविण्यात आले.यासोबतच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.

बेळगाव शहरातून प्रेरणा प्रकाश पाटील, कुशल सोनप्पा गोरल आणि ऐश्वर्या अरुण कुडचीकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. बेळगाव ग्रामीण भागातून नम्रता लक्ष्मण कुंडेकर, साहिबा ख्याजामिया सनदी आणि रोशनी राजू देवण यांनी विजेतेपद मिळवले. खानापूर तालुक्यातून मोनेश महेश गावडे, नेहा गावडू कदम आणि मधुराणी मोहन मालशेट यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवत विशेष कामगिरी बजावली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पत्रकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव व युवा समिती कार्यकर्ते, शालेय शिक्षक, विद्यार्थी, शाळा सुधारणा समिती, पालकवर्ग, मान्यवर, पत्रकार, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button