Uncategorized
Trending

मराठा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकिसाठी 15 जागांसाठी 61 अर्ज दाखल

बेलगाम प्राईड : मराठा समाजाची प्रतिष्ठेची मानली जाणारी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 15 जागांसाठी एकूण 61 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीची शक्यता कमी असून चुरसीची होणार आहे.

बँकेच्या 15 संचालक पदांमध्ये सामान्य गटासाठी 9 जागा, महिला गटासाठी 2, ओबीसीसाठी 1, ओबीसी (बी) साठी 1, अनुसूचित जातीसाठी 1, आणि अनुसूचित जमातीसाठी 1 जागा राखीव आहेत. या सर्व जागांसाठी 22 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सामान्य गटातून 36, महिला मधून 9, ओ बी सी ए मधून 3, ओ बी सी बी मधून 7, एस सी मधून 3, एस टी मधून 3 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

शनिवारी,14 डिसेंबर, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 61 अर्ज सादर करण्यात आले. अर्जांची छाननी उद्या, 17 डिसेंबर रोजी होणार आहे, तर 18 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर निवडणुकीचा प्रचार सुरू होईल.

सत्ताधारी गटात अद्यापही एकमत झालेले नाही. त्यामुळे यंदा निवडणूक होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. विद्यमान संचालकांमध्ये मतभेद असल्याने बिनविरोध निवडीची शक्यता आता मावळली आहे. अर्ज माघारीनंतर सत्ताधारी गटाविरोधात किती पॅनेल उभे राहतील आणि किती उमेदवार रिंगणात राहतील, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

बिनविरोध निवडीसाठी वरिष्ठ संचालक अद्यापही प्रयत्नशील आहेत. बैठका आणि समेट घडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून सोमवारी अंतिम निर्णय अपेक्षित आहे. तथापि, विद्यमान वाद व उमेदवारांची संख्या पाहता निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.

बेळगाव शहर व तालुक्यातील सभासदांची मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल करणे आणि निवडणुकीतील रंगत पाहता, यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सभासदांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. मराठा को-ऑपरेटिव्ह बँक ही मराठा समाजासाठी आर्थिक कणा मानली जाते. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणते पॅनेल जिंकणार, याकडे मराठा समाजात लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button