शांताई’च्या वतिने कॅन्सरबद्दल जनजागृती : कॅन्सर योद्धांचा सत्कार

बेलगाम प्राईड / स्वतः कॅन्सर अर्थात कर्करोगा सारख्या आजारातून मुक्त होऊन मनोबलाच्या जोरावर या गंभीर आजारावर मात करता येऊ शकते, असा समाजाला संदेश देण्याचे काम करणाऱ्या बेळगाव शहरातील कॅन्सर योद्धा अपर्णा खानोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा शांताई वृद्धाश्रमाच्या वतीने आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या पुढाकाराने सत्कार करण्यात आला.
शांताई वृद्धाश्रमाच्या आवारात गेल्या बुधवारी 16 एप्रिल रोजी आयोजित सत्कार समारंभाचे औचित्य साधून अपर्णा खानोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित आश्रमातील आजा-आजींना नाट्य स्वरूपात कॅन्सर संदर्भात कोणती खबरदारी घ्यायची? याची माहिती दिली. अपर्णा खानोलकर यांनी यावेळी बोलताना स्वतः ब्रेस्ट कॅन्सर होऊन मरणाच्या दारात जाऊन परत येऊन आता आपलं जीवन कसे छान जगत आहोत याची माहिती दिली. तत्पूर्वी समाजातील कॅन्सर झालेल्या व्यक्तींना भेटून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी काम करणाऱ्या अपर्णा खानोलकर आणि त्यांच्या सहकारी कॅन्सर योद्धांचा शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी सन्मान केला.
समाजामधील इतर कॅन्सर पीडित रुग्णांना जाऊन भेटून त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचे स्तुत्य कार्य खानोलकर व त्यांचे सहकारी करत आहेत. प्रत्येक भागामध्ये जाऊन कॅन्सर झालेल्यांना त्याच्यातून कशा पद्धतीने बाहेर पडता येते आणि कशा पद्धतीने औषधं घ्यावीत हे स्व अनुभवावरून सांगून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम या सर्वांनी ठरवलेलं आहे.
या पिंक वॉरियर्स प्रमाणे तालुक्यांमध्ये कार्यरत अन्य पिंक वॉरियर्सचा शांताई वृद्धाश्रमामध्ये सन्मान करण्याचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येईल असे शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे आणि अध्यक्ष विजय पाटील त्यांनी स्पष्ट केले. शांताई वृद्धाश्रमामध्ये एक दिवसाचा पिंक वॉरियर्सचा आणि त्यांना कॅन्सर मधून मुक्त करण्यासाठी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचा सन्मान असा दुहेरी कार्यक्रम घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
तसेच त्यासाठी बेळगाव शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते सहकार्य करतील असे सांगण्यात आले. शेवटी आश्रमातील सर्व आजा-आजींनी तीन कॅन्सर वारियर यांना देवा तुला काळजी रे.. या गाण्यावर आजी आजोबांनी उपस्थित कॅन्सर योद्धांना दिलेल्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सांगता झाली.