शहरात वाहन अपघात झालेल्या घटनेतील या दुचाकी चोरी गेल्या असल्याच्या नोंद

बेलगाम प्राईड / बेळगाव शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत अपघात आणि चोरीच्या चार गुन्ह्यांची नोंद झाली असून, यामध्ये दोन गंभीर अपघात आणि दोन दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. यातील आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बेळगाव शहरात अलिकडच्या काही दिवसांत वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांनी नवे विचित्र प्रकार उघडकीस आले आहेत उत्तर रहदारी विभाग, शहापूर, खडेबाजार आणि काकती पोलीस ठाण्यांत नोंदवलेल्या घटनांतून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिली घटना 16 एप्रिल रोजी सायंकाळी कुवेंपू नगर, दाजीबा देसाई रोड येथे घडली. अज्ञात दुचाकीस्वाराने चालत असलेल्या 14 वर्षीय अपंग मुलगा चैतन श्रीनिवास याला जोरदार धडक दिली.
या अपघातात मुलाच्या डोक्याला आणि दोन्ही हात-पायांना गंभीर दुखापत झाली. धडक दिल्यानंतर आरोपी दुचाकीसह घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी श्रीपाद पंडुरंग नाईक यांच्या तक्रारीवरून उत्तर संचार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, 14 एप्रिल रोजी रात्री ते 15 एप्रिल सकाळच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने आनंद नगर, येळ्ळूर रोड येथून लॉक केलेली सुझुकी ऍक्सेस स्कूटर (क्र. KA 22 HQ 4905) चोरी केली. स्कूटरची किंमत 99,000 रुपये असून याप्रकरणी श्रवणकुमार रवीराज हेगडे यांनी शहापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
तिसऱ्या प्रकरणात, रेवती अमर भडगांव या फार्मसी व्यवसायिक महिलेची सुझुकी ऍक्सेस स्कूटर पाटील माळ परिसरातील त्यांच्या घरासमोरून चोरी झाली. या दुचाकीची किंमत 62,000 असून खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या घटनेत, काकती येथील आंबेडकर गल्लीतील सुनंदा तानाजी शिंदे या 55 वर्षीय महिलेवर MH-51-0805 क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे गाडी चालवून धडक दिली. या अपघातात त्यांचा डावा पाय, उजवा हात व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी प्रविण शिंदे यांनी तक्रार नोंदवली असून काकती पोलिसांकडून तपास सुरू आहे.
चारही घटनांमध्ये आरोपी अद्याप फरार असून, संबंधित पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.