ट्रकच्या धडकेत एसटी चालकाचा जागीच मृत्यू ; ९ प्रवासी जखमी

बेलगाम प्राईड / बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावरील सुपे आरटीओ नाक्यानजीकच्या अवघड वळणावर ट्रक आणि चंदगड डेपोच्या एसटी बसची जोरदार धडक होऊन यामध्ये एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी बाची नजीक घडली. लक्ष्मण पांडुरंग हळदणकर (रा.चंदगड) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की, आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. यावेळी (के ए २५ ए बी ९७७५) या ट्रकने बेळगावला जाणाऱ्या (एमएच १४ बी टी १५४१) बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहक चालक सुरेश मर्णहोळकर ( रा. घुल्लेवाडी, ता. चंदगड) यांच्यासह ९ प्रवासी गंभीर जखमी झाले. यामधील अत्यवस्थ असलेल्या चार जणांना बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर ६ प्रवाशांना चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे २ तास वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चंदगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
बेळगाव – वेंगुर्ला रस्त्यावरील सुपे आरटीओ नाक्या नजीकच्या वळणावर आज अखेर शेकडो बळी गेले आहेत. हे वळण म्हणजे मृत्यूचा सापळाच आहे. वळण काढण्यासाठी शासनाकडे अनेक वेळा निवेदने व तक्रारी प्रवाशांनी दिल्या होत्या. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. आज या वळणाची पुन्हा एकदा घटनास्थळी चर्चा होती.